१३
येशू शिष्यांचे पाय धुतो
१ आता, वल्हांडण सणाअगोदर असे झाले की, येशूने आता या जगांतून पित्याकडे निघून जाण्याची वेळ आली आहे, हे जाणून, या जगातील स्वकीयांवर त्याची जी प्रीती होती, ती त्याने शेवटपर्यंत केली. २ शिमोनाचा पुत्र यहूदा इस्कार्योत याच्या मनात येशूला विश्वासघाताने शत्रूच्या हाती द्यावे असे सैतानाने आधीच घातले होते. ३ येशू जाणत होता की, पित्याने त्याच्या हातात सर्व दिले होते आणि तो देवाकडून आला होता व देवाकडे जात होता; ४ येशू भोजनावरून उठला, त्याने आपली बाह्यवस्त्रे एकीकडे ठेवली आणि एक कापड घेऊन आपल्या कमरेला बांधला. ५ त्यानंतर येशू एका गंगाळात पाणी ओतून आणि तो शिष्यांचे पाय धुऊ लागला व कमरेला बांधलेल्या कापडाने पुसू लागला. ६ मग तो शिमोन पेत्राकडे आला, तेव्हा तो त्यास म्हणाला, “प्रभूजी, आपण माझे पाय धुता काय?” ७ येशूने त्यास उत्तर दिले, “मी काय करतो ते तुला आता कळत नाही, पण ते तुला पुढे कळेल.” ८ पेत्र त्यास म्हणाला, “तुम्हास माझे पाय कधीही धुवावयाचे नाहीत.” येशूने त्यास उत्तर दिले, “मी तुला धुतले नाही, तर तुला माझ्याबरोबर वाटा नाही.” ९ शिमोन पेत्र त्यास म्हणाला, “प्रभूजी, माझे केवळ पायच धुऊ नका, तर हात आणि डोकेही धुवा.” १० येशूने त्यास म्हटले, “ज्याचे स्नान झाले आहे त्यास पायांशिवाय दुसरे काही धुवायची गरज नाही, तर तो सर्वांगी शुद्ध आहे; तुम्ही शुद्ध आहा, पण सगळे जण नाही.” ११ कारण आपणाला विश्वासघाताने शत्रूच्या हाती कोण धरून देणार आहे हे त्यास ठाऊक होते, म्हणून तो म्हणाला, “तुम्ही सगळे जण शुद्ध नाही.”
१२ मग त्याने त्यांचे पाय धुतल्यावर आपली बाह्यवस्त्रे घालून व तो पुन्हा खाली बसल्यावर त्यांना म्हणाला, “मी तुम्हास काय केले ते तुम्हास समजले काय? १३ तुम्ही मला ‘गुरू’ आणि ‘प्रभू’ म्हणता आणि ते ठीक म्हणता, कारण मी तसाच आहे. १४ मग मी जर तुमचा प्रभू आणि गुरू असता तुमचे पाय धुतले तर तुम्हीपण एकमेकांचे पाय धुवावेत. १५ कारण मी तुम्हास केले तसे तुम्हीही करावे म्हणून मी तुम्हास उदाहरण दिले आहे. १६ मी तुम्हास खरे खरे सांगतो, दास आपल्या धन्यापेक्षा मोठा नाही; आणि पाठवलेला पाठवणाऱ्यापेक्षा मोठा नाही. १७ या गोष्टी तुम्हास समजतात तर त्याप्रमाणे वागल्याने तर तुम्ही धन्य आहात. १८ मी तुमच्यातील सर्वांविषयी बोलत नाही. मी ज्यांना निवडले आहे त्यांना मी ओळखतो. तरी, ‘ज्याने माझी भाकर खाल्ली त्यानेच माझ्याविरुद्ध आपली टाच उचलली,’ हा शास्त्रलेख पूर्ण झाला पाहिजे. १९ आतापासून हे होण्याच्या आधीच मी हे तुम्हास सांगून ठेवतो, यासाठी की जेव्हा हे होईल, तेव्हा तुम्ही विश्वास ठेवावा की, मी तो आहे. २० मी तुम्हास खरे खरे सांगतो की, मी ज्याला पाठवतो त्याचा जो स्वीकार करतो तो माझा स्वीकार करतो आणि जो मला स्वीकारतो तो ज्याने मला पाठवले त्यास स्वीकारतो.”
२१ असे बोलल्यावर येशू आत्म्यात अस्वस्थ झाला आणि साक्ष देऊन म्हणाला, “मी तुम्हास खरे खरे सांगतो, तुमच्यांतला एकजण मला विश्वासघात करून शत्रूच्या हाती धरून देईल.” २२ तो कोणाविषयी बोलतो या संशयाने शिष्य एकमेकांकडे पाहू लागले. २३ तेव्हा ज्याच्यावर येशूची प्रीती होती असा त्याच्या शिष्यांतील एकजण येशूच्या उराशी टेकलेला होता. २४ म्हणून ज्याच्याविषयी तो बोलतो तो कोण आहे हे आम्हास सांग, असे शिमोन पेत्राने त्यास खुणावून म्हटले. २५ तेव्हा तो तसाच येशूच्या उराशी टेकलेला असता त्यास म्हणाला, “प्रभूजी, तो कोण आहे?” २६ येशूने उत्तर दिले, “मी ज्याला हा घास ताटात बुचकळून देईन, तोच तो आहे.” आणि त्याने तो घास ताटात बुचकळून, तो शिमोनाचा पुत्र यहूदा इस्कार्योत याला दिला. २७ आणि घास दिल्याबरोबर सैतान त्यांच्यामध्ये शिरला. मग येशूने त्यास म्हटले, “तुला जे करावयाचे आहे ते लवकर करून टाक.” २८ पण त्याने त्यास असे कशासाठी सांगितले हे भोजनास बसलेल्यातील कोणालाही समजले नाही. २९ कारण यहूदाजवळ डबी होती म्हणून सणासाठी आपणांस गरज आहे ते विकत घ्यावे किंवा गरिबांस काहीतरी द्यावे असे येशू सांगतो आहे, असे कित्येकांस वाटले. ३० मग घास घेतल्यावर तो लगेच बाहेर गेला; त्यावेळी रात्र होती.
३१ तो बाहेर गेल्यावर येशू म्हणाला, “आता मनुष्याच्या पुत्राचे गौरव झाले आहे आणि त्याच्याठायी देवाचे गौरव झाले आहे; ३२ देव आपल्याठायी त्याचे गौरव करील. तो त्याचे लवकर गौरव करील. ३३ मुलांनो, मी अजून थोडा वेळ तुमच्याबरोबर आहे; तुम्ही माझा शोध कराल; आणि मी यहूदी अधिकाऱ्यांना सांगितले की, ‘मी जाईन तिकडे तुम्हास येता येणार नाही.’ तसे तुम्हासही आता सांगतो. ३४ मी एक नवी आज्ञा तुम्हास देतो; तुम्ही एकमेकांवर प्रीती करावी. जशी मी तुमच्यावर प्रीती केली तशी तुम्हीही एकमेकांवर प्रीती करावी. ३५ तुमची एकमेकांवर प्रीती असली म्हणजे यावरुन सर्व ओळखतील की, तुम्ही माझे शिष्य आहात.”
३६ शिमोन पेत्र त्यास म्हणाला, “प्रभूजी, आपण कोठे जाता?” येशूने त्यास उत्तर दिले, “मी जाईन तिकडे, आता, तुला माझ्यामागे येता येणार नाही; पण नंतर तू येशील.” ३७ पेत्र त्यास म्हणाला, “प्रभूजी, मला आपल्यामागे आताच का येता येणार नाही? मी आपल्यासाठी माझा जीव देईन.” ३८ येशूने त्यास उत्तर दिले, माझ्यासाठी तू आपला जीव देशील “काय? मी तुला खरे खरे सांगतों, तू मला तीनदा नाकारशील तोपर्यंत कोंबडा आरवणार नाही.