२
देवाच्या कृपेने तारण मिळते
१ आणि तुम्ही आपले अपराध आणि पापामुळे मरण पावला होता, २ ज्यामध्ये तुम्ही पूर्वी चालत होता, हे तुमचे कृत्य जगाच्या चालिरीतीप्रमाणे अंतरीक्षाचा राज्याधिपती जो सैतान, म्हणजे आज्ञा मोडणाऱ्या लोकात आता कार्य करणाऱ्या दुष्ट आत्म्याचा अधिपती, ह्याच्या वहीवाटीप्रमाणे असे होते. ३ आम्ही सर्व यापूर्वी या अविश्वासणाऱ्यांमध्ये आपल्या शारीरिक वासनेने वागत होतो, शरीर आणि मनाच्या इच्छेप्रमाणे करत होतो व आम्ही स्वभावाने इतरांप्रमाणे राग येणारे लोक होतो. ४ पण देव खूप दयाळू आहे कारण त्याच्या महान प्रीतीने त्याने आमच्यावर प्रेम केले. ५ आम्ही आमच्या अपराधामुळे मरण पावलेले असता त्याने आम्हास ख्रिस्ताबरोबर नवीन जीवन दिले. तुमचे तारण कृपेने झाले आहे. ६ आणि आम्हास त्याच्याबरोबर उठवले आणि स्वर्गीय स्थानात ख्रिस्त येशूसोबत बसविले. ७ यासाठी की, येशू ख्रिस्तामध्ये त्याची आम्हांवरील प्रीतीच्याद्वारे येणाऱ्या युगात त्याची महान कृपा दाखविता यावी. ८ कारण देवाच्या कृपेने विश्वासाच्याद्वारे तुम्हास शिक्षेपासून वाचवले आहे आणि ते आमच्याकडून झाले नाही, तर हे दान देवापासून आहे, ९ आपल्या कर्मामुळे हे झाले नाही यासाठी कोणी बढाई मारू नये. १० कारण आम्ही देवाच्या हाताची कृती आहोत जी ख्रिस्तामध्ये आहे जेणेकरूण आम्ही जीवनात चांगली कामे करावी जे देवाने आरंभीच योजून ठेवले होते.
यहूदी व परराष्ट्रीय ह्यांचे ख्रिस्ती मंडळीत ऐक्य झाले आहे
११ म्हणून आठवण करा, एकेकाळी तुम्ही शरीराने परराष्ट्रीय होता आणि ज्यांची शरीराची सुंता मनुष्याच्या हाताने झालेली होती ते लोक स्वतःला सुंती असे म्हणत, ते त्यांना बेसुंती संबोधत. १२ त्यावेळी तुम्ही ख्रिस्तापासून वेगळे होता, इस्राएलाच्या बाहेरचे होता, वचनाच्या कराराशी तुम्ही अपरिचित असे होता, तुम्ही तुमच्या भविष्याविषयी आशाविरहित आणि देवहीन असे जगात होता. १३ पण आता, ख्रिस्त येशूमध्ये जे तुम्ही एकेकाळी देवापासून दूर होता, पण आता, येशू ख्रिस्तामध्ये ते तुम्ही ख्रिस्ताच्या रक्ताने त्याच्याजवळ आले आहात.
१४ कारण तोच आमची शांती आहे, त्याने यहूदी आणि विदेशी या दोघांना एक लोक असे केले. त्याच्या देहाने त्याने आम्हास एकमेकांपासून दुभागणारी आडभिंत पाडून टाकली. १५ त्याने आज्ञाविधीचे कायदे आणि नियमशास्त्र आपल्या देहाने रद्द केले. यासाठी की स्वतःमध्ये दोघांचा एक नवा मनुष्य निर्माण करून शांती आणावी. १६ त्याने वधस्तंभावर वैर जीवे मारून त्याच्याव्दारे एका शरीरात दोघांचा देवाबरोबर समेट करावा. १७ ख्रिस्त आला आणि त्याने जे दूर होते त्यांना अणि जे जवळ होते त्यांना शांतीची सुवार्ता सांगितली. १८ कारण येशूच्याद्वारे, आम्हा दोघांचा एका पवित्र आत्म्यात देवाजवळ प्रवेश होतो. १९ यामुळे तुम्ही आता परके आणि विदेशी नाही. तर त्याऐवजी तुम्ही पवित्रजनांच्या बरोबरचे सहनागरीक आणि देवाचे कुटुंबीय आहात २० तुम्ही प्रेषित आणि संदेष्टे यांच्या शिक्षणाच्या पायावर बांधलेली इमारत आहात आणि ख्रिस्त येशू स्वतः तिचा कोनशिला आहे. २१ संपूर्ण इमारत त्याच्याद्वारे जोडली गेली आणि प्रभूमध्ये पवित्र भवन होण्यासाठी वाढत आहे. २२ त्याच्यामध्ये तुम्हीसुद्धा इतरांबरोबर देवाच्या आत्म्याद्वारे देवाचे राहण्याचे ठिकाण तयार करण्यासाठी एकत्र बांधले जात आहात.